Oplus_16908288

सावद्यात शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण सुरू

दहा दिवसीय उपक्रमात रावेर तालुक्यातील १२३ शिक्षकांचा सहभाग

सावदा / लाला कोष्टी मो 9404055633

– राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद कार्यालयाच्या निर्देशानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयांमधील शिक्षकांसाठी महत्त्वाचे असलेले वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण सावदा येथे १३ ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सावदा (ता. रावेर) येथील स्वामीनारायण गुरुकुलमध्ये सुरू असलेल्या या दहा दिवसीय प्रशिक्षणात रावेर तालुक्यातील एकूण १२३ शिक्षक सहभागी झाले आहेत. यामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ९२, तर निवड वेतन श्रेणीसाठी ३१ शिक्षकांचा समावेश आहे. प्रशिक्षण केंद्राला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी भेट देऊन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण वर्गातील शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच तालुका शिक्षण विभागाचे तालुका समन्वयक भूषण चौधरी (केंद्रप्रमुख, कुसुंबे) यांनी सदिच्छा भेट देऊन प्रशिक्षणाच्या कामकाजाची पाहणी केली. शैक्षणिक साहित्य व इतर बाबींची जबाबदारी उपसमन्वयक प्रफुल्ल मानकर सांभाळत आहेत. या प्रशिक्षणासाठी एकूण २०० गुणांचे मूल्यमापन निश्चित करण्यात आले आहे. उत्तीर्ण होण्यासाठी किमान १०० गुण मिळवणे आवश्यक आहे. हे मूल्यमापन दोन स्वतंत्र टप्प्यांत होणार असून, प्रत्येक टप्प्यात किमान २५ गुण मिळवणे बंधनकारक आहे. पहिला टप्पा १०० गुणांचा असून, प्रशिक्षण सुरू असताना तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित पाच स्वाध्यायांसाठी ५० गुण, तर लेखी परीक्षेसाठी ५० गुण निश्चित करण्यात आले आहेत. दुसरा टप्पाही १०० गुणांचा असून, प्रशिक्षण संपल्यानंतरच्या ४० दिवसांच्या कालावधीत तो पूर्ण करायचा आहे. यामध्ये पाच लेखी स्वाध्यायांसाठी ५० गुण, तर प्रकल्प अहवालासाठी ५० गुण असतील. तज्ज्ञ सुलभकांचे मार्गदर्शन लाभले या प्रशिक्षणात सुलभक म्हणून दीपक रमाकांत सोनार (केंद्रप्रमुख, विवरे), संदीप उदावंत (केंद्रप्रमुख, खानापूर), सौ. मीनाक्षी दोडके, गोकुळ बाबुराव भोई (उ.शि.), रमेश परशुरामब राठोड (प.शि.), पंकज बगाडे (उ.शि.), रविंद्र पाटील, दीपक कोंडे, विठोबा वाघ, पवन निकम, नितीन चौधरी आणि दीपक नेहेते आदी तज्ज्ञ सुलभकांचे मार्गदर्शन लाभत आहे.