सावद्यात श्री. आ. गं. हायस्कूल व श्री. ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
सावदा, प्रतिनिधी : सावदा येथील श्री. आ. गं. हायस्कूल व श्री. ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार (दि. 15 जून 2026) रोजी नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि शैक्षणिक प्रक्रियेशी त्यांची अधिक दृढ नाळ जोडली जावी, या उद्देशाने प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला सावदा पोलीस स्टेशनचे एपीआय विशाल पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष तेली, विद्यालयाचे प्राचार्य पी. जी. भालेराव तसेच पर्यवेक्षक संजय मोतीराम महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना एपीआय विशाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, जागरूकता आणि भविष्याची योग्य दिशा यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थिनींनी शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करून स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 112 या आपत्कालीन क्रमांकाचा वापर करून त्वरित पोलिसांची मदत घेता येते, याची माहिती देत विद्यार्थ्यांना सजग नागरिक बनण्याचा संदेश दिला.
भविष्यातील ध्येय निश्चित करून त्यासाठी आतापासूनच तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नंदू पाटील यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.